
महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा
कल्याण डोंबिवली दि.26 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उर्जा संवर्धन आणि सौर उर्जा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ग्रीन एनर्जीसह उर्जा संवर्धन पुरस्कार देऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला गौरवण्यात आले. नवी दिल्लीत झालेल्या १३ व्या ग्रीन एनर्जी समिटच्या शानदार सोहळ्यात केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला. (Indian Chamber of Commerce Energy Conservation Award with Green Energy to Kalyan Dombivli Municipal Corporation)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने २००७ पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे बसवणे विकासकांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करत प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे. २००७ ते २०२१ या कालावधीत एकूण १ हजार ८३२ इमारतीवर १ कोटी ८ लाख लीटर्स प्रतीदिन क्षमतेचे सौरउष्ण जल सयंत्रे विकासकाकडून बसविण्यात आली. त्यामुळे इमारतीमध्ये विद्युत गिझरचा वापर न होता प्रती
वर्ष १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे.
तर २०२१ पासून महानगरपालिकेने विकासकांना रुफटॉप नेटमीटर सौरउर्जा निर्मिती करणारे प्रकल्प बसवणे बंधनकारक केले आहे. आजपर्यंत १९७ इमारतींवर ३.६ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा निर्मिती करणारे हे प्रकल्प विकासकाकडून कार्यान्वित असल्याने दरवर्षी तब्बल ५२ लाख विज युनिट सौर उर्जा निर्मिती होत आहे.
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभागक्षेत्र कार्यालयासाठी एकूण १६० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे कार्यान्वित बसविण्यात आली आहेत. महापालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण प्रकल्प, कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी १२० किलो वॅट क्षमतेची, महापालिकेच्या १५ इमारतीवर ०.४४ मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा सयंत्रे आस्थापित असून त्याद्वारे प्रतिवर्षी ६.३४ लाख सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.
उर्जा संवर्धन क्षेत्रात केडीएमसीने महापालिका निधी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील जुने परंपरागत सोडीयम दिवे काढून उर्जा बचत करणारे एलईडी पथदिवे बसविलेले आहेत. उर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या दोन्ही रंगमंदिरातील परंपरागत चिलर काढून उर्जा कार्यक्षम आणि उर्जा बचत करणारे चिलर, महापालिका कार्यालयांमध्ये उर्जा बचत करणारे २८ वॅट क्षमतेचे सिलीग फॅन-एलईडी लाईट्स बसवून उर्जा संवर्धन क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे.
त्यासोबतच उर्जा संवर्धन आणि सौर उर्जा वापराबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धा, वेगवेगळे महोत्सव, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पथनाट्य- उर्जा संवर्धन गीताच्या माध्यमातून शहरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कामही केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागातर्फे ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा बचतीसाठी विविध स्तरावर काम केले जात आहे. या सर्व सकारात्मक प्रयत्नांचा विचार करता इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे हा 5 वा ग्रीन एनर्जी पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याची प्रतिक्रिया विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.