लोकसभा निवडणुकीतील प्रचारातील आश्वासनाची वचनपूर्ती
वासिंद दि.१४ जून :
वासिंद पूर्वेकडील ४२ गावांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरील पूलाचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे वासिंदकरांना विकास व प्रगतीची दारे खुली होती, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नव्या पुलाच्या वासिंदवासियांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील प्रचारात दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मोदी@९ अंतर्गत विकास पर्व कार्यक्रमात वासिंद येथील रेल्वेपूलाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, ज्येष्ठ नेते दशरथ तिवरे, देवेश पाटील, अशोक इरनक, मारुती धिर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, संजय निमसे, काळूराम धनगर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदिप पाटील, रिपब्लिकन पक्षाचे बाळकृष्ण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय राखीव योजनेतून (सीआरएफ) वासिंद येथील रेल्वेमार्गावरील पुलासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या पुलाबरोबरच मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात अनेक कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदी व नितीन गडकरी यांचे आभार मानले.
या पुलासाठी अनेक नेत्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. परंतु, त्याबद्दल त्यांना कोणीही दोष देऊन नये. आपल्या सर्व वासिंदकरांच्या प्रयत्नांमुळेच अनेक वर्ष रखडलेला पूल साकारला जात आहे, असे मंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले.
शहापूर रेल्वे स्टेशनासाठी प्रयत्न…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत वासिंद रेल्वे पूल, तानशेत व उंबरमाळी रेल्वे स्टेशनसह अनेक प्रकल्प मार्गी लागले. यापुढील काळात शहापूर रेल्वे स्टेशन मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. जुन्या वासिंद अंडरपासमधील साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पाणी उपसण्याचा पंप यापुढेही कायम ठेवला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक अंडरपास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा कपिल पाटील यांनी केली.
डावा-उजवा कालवा उभारणार…
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला भातसा धरण प्रकल्पातील डावा व उजव्या कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाण्यावरील १८ टक्के सिंचनाचे आरक्षण मिळाले आहे, असे कपिल पाटील यांनी सांगितले.