कल्याण ग्रामीण दि.१६ जून :
प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला घेसर वडवली रस्ता गेल्या पंचवीस वर्षांपासून नादुरुस्त होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ करत होते. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा योजनेंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. शुक्रवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील वडवली घेसर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला होता. घेसर वडवली रस्ता थेट अंबरनाथ तालुक्यातील गावांना जाऊन मिळत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. अखेर या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करण्याच्या वेळेत वाहनचालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र पावसाळ्याआधी रस्त्याचे काम पूर्ण करून मनसे आमदार राजू पाटील यांनी हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे.
यावेळी मा. नगरसेवक प्रभाकर पाटील ,उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक तकदीर काळन, काशिनाथ पाटील, अनंता पाटील, संतोष पाटील, संदीप म्हात्रे, संजय पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.