डोंबिवली दि.28 सप्टेंबर :
सुरुवातीला लसींअभावी कल्याण डोंबिवलीत काहीशी मंदावलेली कोवीड लसीकरण आता हळूहळू वेग घेताना दिसत आहे. डोंबिवली पश्चिमेच्या कोपर परिसरात 10 हजार नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून प्रभागनिहाय लसीकरणाचा हा एकप्रकारे विक्रम मानला जात आहे.
डोंबिवली पश्चिमेच्या कोपर रोड प्रभागात शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. साधारणपणे 5 महिन्यांपूर्वी म्हणजेच 15 एप्रिलपासून रमेश म्हात्रे यांच्यामार्फत याठिकाणी कोवीड लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात लसींच्या तुटवड्यामूळे कल्याण डोंबिवलीतील इतर ठिकाणांप्रमाणे या प्रभागातही नागरिकांच्या लसीकरणाला वेग मिळत नव्हता. मात्र गेल्या काही आठवड्यात लससाठ्याच्या पुरवठ्यात बऱ्याच प्रमाणात सुसूत्रता आल्याने लसीकरणाचा वेगही चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामूळेच आज सखाराम कॉम्प्लेक्स, कोपर रोड येथील केंद्राने 10 हजार लसीकरणाचा टप्पा पार केला. प्रभागातील मयुरी हिरालाल किर्तीकुडव ही 10 हजाराव्या क्रमांकाची मानकरी ठरली.
याठिकाणी असणाऱ्या कोवीड लसीकरण केंद्रामध्ये केवळ प्रभागातील नागरिकांपुरताच मर्यादित न ठेवता जे जे नागरिक लस घेण्यासाठी आले त्या सर्वांचे आम्ही लसीकरण केल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी दिली. त्याचबरोबर वैद्यकीय कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, कल्याणातील वकील, शिक्षक, पोलीस बँक अधिकारी-कर्मचारी आदींनीही याठिकाणी लस घेतली आहे. तसेच 10 हजार लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यासाठी केडीएमसीचे सर्व अधिकाऱ्यांनी केलेलं सहकार्य आणि आपल्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचेही रमेश म्हात्रे म्हणाले.