आपण केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
कल्याण दि.28 एप्रिल:
कल्याण पूर्वेत मागील १० वर्षात अनेक महत्त्वाची कामे झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही कामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. कल्याण पूर्वेतील महायुतीच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते.(In the last 10 years many important works have been done in Kalyan East; Mr. Dr. Shrikant Shinde’s interaction with the office bearers of Mahayuti in Kalyan East)
कल्याण पूर्व येथील मॉडेल शाळेच्या मैदानात आज (रविवारी) महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मागील १० वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत चक्की नाका-मलंगगड रोड, कल्याण शीळ रोड, पत्रीपूल, अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते अशी अनेक कामे झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
तर कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग हा ८०० कोटींचा प्रकल्प प्रगतीपथावर असून याचा कल्याणकरांना मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याणकरांचा बोगद्याचा प्रवास बंद होणार असून थेट रेल्वे स्थानकात जाता येणार आहे. रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित झाली असून त्यामुळे एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली. तसेच कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, पण आपण त्यापलीकडे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य स्मारक कल्याण पूर्वेत उभारले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही निवडणूक देशाची निवडणूक असून आपली ही कामे पुढे नेण्यासाठी कल्याणची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. तर राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या अडीच वर्षात तब्बल १२५ कोटी रुपये दिले, ज्याचा गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा झाला. गोरगरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून खोणी आणि शिरढोण येथे घरे बांधण्यात आली. राज्यात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्याचे सांगत ही निवडणूक एका व्यक्तीची नव्हे, तर देशाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासाठीच आपण केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, कल्याण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, रमेश हनुमंते, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव भरत गंगोत्री, सोनिया धामी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, प्रशांत काळे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, रिपाइंचे संजय जाधव, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.