डोंबिवली दि.17 सप्टेंबर :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केडीएमसीवर भाजपाचाच महापौर बसेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त वाटप आणि कार्यकारिणी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी हा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शब्दाला जागतील…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कार्यकारिणीत नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतही हेच सूत्र वापरले जाईल. या निवडणुकीनंतर पालिकेवर भाजपाचा महापौर असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबतीत त्यांच्या शब्दाला जागतील असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार गायकवाड यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला…
माकडे त्या झाडावर असतात ज्या झाडाला गोड फळे येतात, त्याच झाडावर दगड मारले जातात. अशाच पध्दतीने आमदार गायकवाड यांनी भरपूर विकासकामे केली आहेत. ती काही जणांना सहन होत नसल्याने आमदार गायकवाड यांना लक्ष केले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे असते असा सल्लाही मंत्री चव्हाण यांनी आमदार गणपत गायकवाड यांना दिला.
छेडण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर…आमदार गायकवाड
त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी आता माझ्याकडेही राॅकेट असून तेही चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन अशा शब्दांत आमदार गणपत गायकवाड यांनी विरोधकांना यावेळी इशारा दिला. तसेच कल्याण पुर्वेत आतापर्यंत आपण 129 कोटींचा निधी आणला. त्यावर इतर पक्षाचे लोक स्वत:ची नावं लावून आपणच हा निधी आणल्याची टिमकी वाजवत आहेत. आपण हा निधी शासन स्तरावरुन मंजूर करुन घेतला. परंतु काही मंडळींनी हा निधी आणि कामाचे श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक टेबलखाली दडवून ठेवल्याचा गौप्यस्फोटही आमदार गायकवाड यांनी यावेळी केला. पोलीस हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी असतात. पण कल्याणमध्ये शिवसेनेत पदाधिकारी असलेल्या गुंडांना पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो. तो बंदोबस्त काढून घेण्यासाठी आपण शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचेही आमदार गायकवाड यावेळी म्हणाले.
यावेळी शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, महिला आघाडीच्या रेखा चौधरी, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमूख माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिमचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.