महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेची मागणी
कल्याण दि.१६ सप्टेंबर :
कंत्राटी कामगारांना शासन सेवेत कायम करण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत असून कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार – सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले. वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ती अखंड सुरुळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना 65 कंत्राटी कामगारांचा मृत्यु झाला. कोरोना काळात पोलीस, हॉस्पिटल, कोव्हीड सेंटर, लॅबोरेटरीज् ,आरोग्य यंत्रणा आणि अन्य सर्व शासकीय – नागरी सुविधांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात या वीज कंत्राटी कामगारांचेही मोठे योगदान होते. कोवीडसोबतच निसर्ग आणि तोंक्ते वादळातही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची-मोलाची भुमिका बजावली.
या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री आणि उर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आहे.
तसेच या कामगारांचे कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक मानसिक शोषणातून तणावमुक्त करत त्यांना कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार देण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.