रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित
कल्याण डोंबिवली दि.17 एप्रिल :
गेल्या दोन दिवसांपासून असह्य अशा गर्मीने जीव नकोसा झालेला असतानाच काल कल्याण पूर्व पश्चिमेसह डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामूळे नागरिकांना प्रचंड त्रासात रात्र काढावी लागली.(In the already unbearable heat, some parts of Dombivli including Kalyan East and Wests power supply interrupted)
सध्या असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कल्याण डोंबिवलीसह एमएमआर परिसर अक्षरशः होरपळून निघत आहे. काल म्हणजेच मंगळवारी कल्याण डोंबिवलीमध्ये यंदाच्या वर्षातील उच्चांकी असे 43 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान नोंदवले गेले. तर त्याच्या आदल्यादिवशी म्हणजेच सोमवारीही 42 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी गर्मीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून पंखे असो की एसी दोन्हींचा वापरही आपसूकच प्रचंड वाढला आहे.
त्यात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील रामबाग, चिकणघर या परिसरासह कल्याण पूर्वेत काही भागातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. तर डोंबिवलीतही पूर्व – पश्चिमेतील (राजू नगर) काही भागांत काही काळ वीज गायब होती. आणि खंडित झालेल्या या वीज पुरवठ्याने एकप्रकारे आगीमध्ये तेल पडल्यासारखे झाले. आधीच रात्र होऊनही कमी न झालेला असह्य उकाडा आणि त्यात बत्तीगुल त्यामुळे नागरिक आणखीनच हैराण झाले होते.
असह्य उकाड्याने वाढलेला वीजवापर, त्यामुळे महावितरणच्या वीज वाहिन्यांवर ताण येऊन काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला. आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर तांत्रिक बिघाड झालेल्या परिसरामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती काम हाती घेत खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरू झाला. आणि शेकडो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुर्गाडी परिसरातून गेलेले वीज वाहिनी तुटल्याने संपूर्ण दुर्गाडी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर अंधारात बुडाला होता. याठिकाणीही महावितरणकडून पहाटेला दुरूस्ती काम हाती घेण्यात आले.