Home ठळक बातम्या महापालिका निवडणुकांची नांदी ? पुढील आठवड्यापासून शिवसेनेच्या संपर्क अभियानाला सुरुवात

महापालिका निवडणुकांची नांदी ? पुढील आठवड्यापासून शिवसेनेच्या संपर्क अभियानाला सुरुवात

कल्याण पश्चिमेतील 38 प्रभागातही अभियान राबवणार – आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

कल्याण दि.12 एप्रिल :
पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय शिवसेनेतर्फे आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून कल्याण पश्चिमेतील 38 प्रभागांतही अतिशय परिणामकारकपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर हे संपर्क अभियान म्हणजे एकप्रकारे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असल्याची शक्यताही राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. (in-maharashtra-shiv-senas-sampark-campaign-begins-next-week)

शिवसेनेतर्फे काल मुंबईमध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेचे राज्यातील सर्वच आमदार आणि प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवार – मंगळवारपासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेऊन या टिटवाळ्यापासून या संपर्क अभियानाला प्रारंभ होणार आहे. ज्यामध्ये आपल्यासह पक्षाचे सर्वच प्रमूख पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचेही आमदार भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.

दर दिवशी एक वॉर्ड अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रपणे भेटण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत, अडीअडचणी, पक्षवाढीसाठी संवाद साधला जाईल. त्यासोबतच दुसरीकडे संबंधित प्रभागातील सामान्य नागरिकांनाही या संपर्क अभियानात सहभागी होऊन त्यांच्या नागरी समस्या आणि अडीअडचणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील सर्वच्या सर्व म्हणजे 38 प्रभागांमध्ये पुढील आठवड्यापासून हे अभियान राबविण्यात येणार असून ही एकप्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा