महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला राजस्थानातून केली अटक
कल्याण दि.३ एप्रिल :
ज्वेलर्स मालकाने बँकेत भरण्यासाठी दिलेली तब्बल ४५ लाखांची रोकड घेऊन पळालेल्या नोकराच्या साथीदाराला गजाआड करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४१ लाख रुपये हस्तगत केले असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या आठवड्यात २५ मार्च रोजी कल्याण पश्चिमेच्या ज्वेलर्स दुकान मालकाने त्याच्या विश्वासू कर्मचारी रमेश देवासीला बँकेत भरण्यासाठी ४५ लाखांची रोख रक्कम दिली होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे बघून अचानक त्याची नियत फिरली आणि त्याने हे ४५ लाख रुपये बँकेत न भरता पळ काढला होता. बराच वेळ होऊनही रमेश परत आला नाही आणि बँकेत पैसेही न भरल्याने समोर आल्याने रमेश देवासी ही रोख रक्कम घेऊन पळाल्याचे निष्पन्न झाले होते.
यासंदर्भातील ज्वेलर्समालक नरेश शंकलेशा यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनीही आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केली. तर या गुन्ह्यामध्ये रमेश देवासीला जगदीश देवासीने मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ही माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे एक पथक राजस्थान आणि दुसरे पथक गुजरातला रवाना केली. यापैकी राजस्थानला गेलेल्या पथकाने जगदीश देवासीला ताब्यात घेत चोरी झालेले ४१ लाख १५ हजार रुपयेही त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. तर रमेश देवासीचा कसून शोध घेतला जात असून लवकरच त्यालाही पकडण्यात यश येईल असा विश्वास महात्मा फुले पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करत आहेत.