कल्याण दि. ३ जून :
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणात शिवसेना शिंदे गटाकडूनही संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारण्यासह त्याच्यावर पानाच्या पिचकाऱ्या मारून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
पत्रकारांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी असभ्य कृतीद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या या कृत्याचा सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात असून महविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यावर आक्षेप घेतला आहे. तर शिंदे गटाकडूनही संजय राऊत यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दरम्यान कल्याणातही शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासदार राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यावर पानाच्या पिचकाऱ्या मारण्यात आल्या.