Home ठळक बातम्या कल्याणमध्ये बंगले मालकांकडून महावितरणने उघड केली ७८ लाखांची वीजचोरी

कल्याणमध्ये बंगले मालकांकडून महावितरणने उघड केली ७८ लाखांची वीजचोरी

 

कल्याण दि. ७ नोव्हेंबर :
महावितरणच्या कल्याण पुर्व उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बंगले मालकांकडून केल्या जाणाऱ्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये १३ बंगले धारकांकडून महावितरणने ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.

कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एकअंतर्गत सर्वाधिक वीजहानी असणाऱ्या वीजवाहिन्यांच्या परिसरात वीजचोरी शोधण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात याठिकाणी १३ बंगल्यांमधून ३ लाख २७ हजार युनिटची वीजचोरी पकडण्यात आली. यामध्ये भाल येथील एकाच बंगल्यात वीज मीटरशिवाय थेट केबल टाकून तर नेवाळी परिसरात जीन्स कारखान्याची १३ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात महावितरणने या परिसरात ५९ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून ६८ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला. या संबंधितांना वीजचोरीची देयके आणि दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली जाणार आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली आहे.

वीजचोरीविरोधातील ही शोध मोहीम यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा-दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर न करता अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा