कल्याण दि.14 एप्रिल :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच नकारात्मक वातावरण असताना कल्याणात 97 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करत एक सकारात्मक संदेश दिला आहे. रामचंद्र नारायण साळुंखे असे या आजोबांचे नाव असून आपल्याला कोरोनाशी न घाबरता लढून हरवायचं असल्याचा संदेशही त्यांनी ‘एलएनएन’शी बोलताना दिला आहे. (in-kalyan-97-year-old-grandfather-successfully-defeated-corona)
गेल्या महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज वाढणारे रेकॉर्डब्रेक रुग्ण आणि फुल्ल होणारे बेड, ऑक्सिजन – इंजेक्शनचा तुटवडा पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. परंतु या नकारात्मक परिस्थितीतही कल्याणात 97 वर्षांच्या रामचंद्र नारायण साळुंखे आजोबांनी थेट कोरोनाला धोबीपछाड दिला आहे. त्यांच्यावर कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील महापालिका आर्ट गॅलरी कोवीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि त्या उपचारांना त्यांनी खंबीरपणे साथ देत कोरोनावर मात केली. कल्याण डोंबिवलीतील इतर कोवीड रुग्णांनी घाबरून न जाता धैर्याने कोरोनाचा मुकाबला केल्यास त्याला परतावून लावू शकतो असा संदेश या आजोबांनी दिला आहे.
तर आजोबा इकडे दाखल झाले त्यावेळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आम्ही तातडीने त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले खरे. मात्र औषधापेक्षा पेशंटने म्हणजेच रामचंद्र साळुंखे यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवल्याची माहिती डॉ. मुनीर आलम यांनी एलएनएनला दिली. कोवीड रुग्णांवर औषधं तर काम करतीलच मात्र त्याजोडीला रुग्णांनी इच्छाशक्तीही दाखवणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त करत आम्ही शेवटपर्यंत कोरोनाशी लढा देत राहू असे डॉ. मुनीर आलम यांनी सांगितले.