केडीएमसीच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह
कल्याण – डोंबिवली दि.9 जून :
आज संध्याकाळी झालेल्या पावसाने गेल्या 2 महिन्यांपासून अक्षरशः नकोशा केलेल्या उकाड्यावर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला. तरी केडीएमसीने नालेसफाईचे केलेले दावे मात्र या मान्सूनपूर्व पावसात धुवून निघालेले पाहायला मिळाले. कल्याणजवळील शहाड परीसरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या या नालेसफाईवर आणि त्याच्या करण्यात आलेल्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याण मुरबाड रोडवर पौर्णिमा टॉकीजकडून शहाडकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. परिणामी इथल्या वाहतुकीला त्याचा फटका बसून मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. तर शहाडकडून आंबिवलीकडे जाणारा मार्ग पाणी सचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक नागरिक रस्त्यावर साचलेल्या या गुडघाभर पाण्यातून घरची वाट काढताना दिसून आले.
दरम्यान अद्याप पावसाळा नीटसा सुरूही झालेला नसून आजचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. यातच जर सखल भागात अशी अवस्था होणार असेल तर या ट्रेलरवरून आगामी पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती नक्कीच चांगली नसणार हे मात्र नक्की