भिवंडी दि.8 मे :
भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये उद्यापासून 9 मे पासून गृहमतदानाला सुरुवात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, कोविडबाधित मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Loksabah election) (In Bhiwandi Lok Sabha, home voting for disabled and senior citizens will start from tomorrow)
त्यानुसार अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना 12 ड मधील अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी प्राप्त मंजूर अर्जाच्या यादीनुसार भिवंडी लोकसभेत विधानसभानिहाय मतदारसंघाद्वारे 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्या आणि दिव्यांग मतदारांचे मतदान घेण्यात येणार आहे.
विधानसभानिहाय दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक मतदार…
यामध्ये 134 भिवंडी ग्रामीणमध्ये 9-10 मे रोजी मतदान होणार असून (85 पेक्षा अधिक वयाचे 80 मतदार, दिव्यांग मतदार 9,) 135 शहापूरमध्ये 9 -14 मे रोजी (85 वर्षांवरील 62 तर दिव्यांग 8 मतदार) 136 भिवंडीमध्ये 10 आणि 14 मे रोजी (85 वर्षावरील 17 आणि दिव्यांग 3 मतदार,) 137 भिवंडी पूर्वमध्ये 10 – 14 मे रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये 85 वर्षांमधील 14 आणि दिव्यांग 03 मतदार, 138 कल्याण पश्चिममध्ये 11 आणि 12 मे रोजी (85 वर्षावरील 35 आणि दिव्यांग 4 मतदार) तर 139 मुरबाडमध्ये 10 मे आणि 15 मे रोजी गृह मतदान होणार असून त्यात 85 वर्षापेक्षा जास्त 34 आणि दिव्यांग 2, असे एकूण 36 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
संपूर्ण लोकसभा मतदारक्षेत्रात हे 85 वर्षांवरील एकूण 242 तर 29 मतदार हे दिव्यांग मतदार म्हणून आहेत. या सर्व मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्र उभारून मतदान घेण्यात येणार आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यादेखील नेमणुका करण्यात आल्या आहेत. याकरीता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. याबाबत सर्व उमेदवार यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र देखील देण्यात आली आहेत.
होम व्होटिंगसाठी 32 पथके…
या गृहभेटीसाठी 134 भिवंडी ग्रामीणमध्ये 9 पथक, 135 शहापूर 10 पथक, भिवंडी पश्चिममध्ये 2 पथक, भिवंडी पूर्वमध्ये 2 पथक, 138 कल्याणमध्ये 2 पथक, 139 मुरबाडमध्ये 05 अशी एकूण 32 पथके तयार करण्यात आली आहेत. या कामाकरीता केंद्रीय निवडणूक आयोगाने 40 सूक्ष्मनिरीक्षक यांची देखील नेमणूक केली असून या सर्व मतदानाचे व्व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.
गृहमतदानाकरता येणारे कर्मचारी हे त्यांचे ओळखपत्र लावून येतील. त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले असून निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. तर 9 ते 15 मे दरम्यान ही गृहमतदानाची प्रक्रिया पार पडणार येणार असल्याची माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.