
लाडकी बहीण सन्मान योजनेच्या मेळाव्यात भगवा घेतला हाती
कल्याण दि.12 ऑक्टोबर :
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासून आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक समाजहिताच्या योजना लागू करत सामाजिक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या लोकोपयोगी कामांनी प्रभावित कल्याणातील 50 लाडक्या बहिणींनी राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कोकण वसाहत परिसरात झालेल्या लाडकी बहीण सन्मान योजनेच्या कार्यक्रमामध्ये 50 हून अधिक लाडक्या बहिणींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.
अडीच वर्षांपूर्वी राज्यातील सत्ताबदलानंतर स्थापन झालेल्या शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. आणि मग एकामागून एक महत्त्वपूर्ण, सामाजिक निर्णयांचा सपाटा सुरू झाला. लाडक्या बहिणींबरोबरच युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामातून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे सर्वांसाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेतल्याचे दिसले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या कार्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो असून त्यांच्या या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे या महिलांनी सांगितले.
तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ठीकठिकाणी लाडकी बहिण योजनेचे मेळावे यशस्वीपणे झालेले आहेत. हे मेळावे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाने या महिला अतिशय प्रेरित झालेल्या आहेत. त्यातून प्रेरित होऊन या महिलांनी शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
दरम्यान कल्याण पश्चिमेतील म्हसोबा मैदान, कोकण वसाहत,बिर्ला कॉलेज आणि भोईवाडा या भागांमध्ये आज लाडकी बहीण सन्मान मेळावा संपन्न झाला. ज्याला लाभार्थी महिलांची प्रचंड अशी गर्दी झाली होती.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, माजी नगरसेवक संजय पाटील, विद्याधर भोईर, प्रियांका भोईर, नीलिमा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.