·खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे दि.19 जानेवारी :
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरील विषयासह नावाळी येथील आरोग्य केंद्रासाठी आवश्यक जागेचा प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निकाली काढण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने अनेक वर्षांपासून मोबदल्याप्रकरणी प्रलंबित असलेल्या नावाळी येथील आरोग्य केंद्राची जागा नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात असून ही जागा जिल्हा परिषद, ठाणे यांच्या ताब्यात देण्याचा सकारात्मक निर्णय यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ठाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या १४ गावांसाठी नावाळीमधील आरोग्य केंद्र उभारण्याकरिता जागा आवश्यक आहे. त्यामुळे ही जागा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याकरिता खासदार डॉ. शिंदे आग्रही होते. तसेच त्यासाठी अनेक वर्षांपासून स्वतः पाठपुरावाही करीत होते. मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पुन्हा ही मागणी करण्यात आली. त्यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईच्या ताब्यात असलेला राखीव भूखंड ठाणे जिल्हा परिषदेकडे आरोग्य केंद्र उभारण्याकरिता देण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
तर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. ही बाब कळताच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली. खासदारांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. हा विषय अत्यंत महत्वाची बाब म्हणून जिल्हा नियोजन बैठकीतही मांडण्यात आला. खासदार डॉ. शिंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देत रेल्वे प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन तातडीचे करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांना दिल्या.
यासोबतच कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात आदर्श शाळा तयार करण्याकरता जिल्हा नियोजनच्या माध्यमातून १० कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेकडे केली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत रुग्णालय भूखंड आरक्षण क्र. २८३, सर्वे क्र. ३३ आणि मोठे क्रीडासंकुल आरक्षण क्र. २७९, सर्वे क्र. ५५ हे अद्ययावत रुग्णालयासाठी आणि क्रीडासंकुल याकरिता आरक्षित भूखंड असून तेथे अद्ययावत रुग्णालय, क्रीडासंकुल उभारण्याकरिता ६ नोव्हेंबर २०२० रोजी पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत आरक्षित जागेचे अधिग्रहण करून अद्ययावत रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र अधिग्रहण करण्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे जागा अधिग्रहण करण्याकरिता लाभार्थ्यांना विकास हक्कांचे हस्तांतरण (TDR) स्वरुपात मोबदला देणे आणि त्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय, स्पोर्ट स्टेडियम उभारण्याच्या कामांकरिता लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून अद्ययावत रुग्णालय आणि स्पोर्ट स्टेडियम उभारण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. या निर्णयांबाबत समाधान व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.