मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन
कल्याण दि.2 सप्टेबर :
सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार असून सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.(Important Information for Public Ganesha Mandals; Electricity supply will be done by Mahavitran at domestic rate)
गणेश मंडळांनी ही कागदपत्रे करावी सादर…
सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
मंडळांनी ही घ्यावी खबरदारी…
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब – उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून घ्यावी, गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. तर महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध असून त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत…
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.