कल्याण दि.9 डिसेंबर :
तृतीयपंथी हा समाजातील एक दुर्लक्षित, उपेक्षित घटक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी तृतीयपंथी धोरण 2024 अंमलात आणले आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून आपल्या परिक्षेत्रात हे धोरण आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी समाजविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील अस्मिता या किन्नर संस्थेला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. (Implementation by KDMC of policy for third parties; Social Development Department took the initiative)
समाजाकडून सोसावी लागणार अवहेलना आणि केला जाणारा तिरस्कार यामुळे तृतीयपंथीयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तो पाहता या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी हे धोरण लागू केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी केडीएमसी समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी कल्याण पूर्वेतील तृतीयपंथीयांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत समाजातील या दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात मानसन्मानाने जगण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत तृतीयपंथीयांच्या गुरू नीता केणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
तृतीयपंथीयाची प्रथम महापालिकेकडे नोंदणी करून त्यांचे मनोगत, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्यासाठी प्रथमतः महापालिकेच्या नाट्यगृहात किन्नर महोत्सव आयोजित केला जाईल, किन्नर पंथीयांचे बचत गट तयार करून त्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन उदर निर्वाहासाठी मार्केट उपलब्ध करून देऊन उपजीविकेसाठी महापालिकेमार्फत सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपायुक्त संजय जाधव यांनी उपस्थिताना दिले.
त्यावर उपस्थित तृतीयपंथीय समुदायाने महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन देत महापालिकेच्या या पुढाकाराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच महापालिका आयुक्त या स्वतः डॉक्टर असून या संस्थेतर्फे त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळही मागण्यात आली आहे. त्याला आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच किन्नर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.