
कल्याण ग्रामीण दि.२१ मे :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये नागरिकांकडून दहापट कर आकारणी केडीएमसीकडून करण्यात येत आहे. तर केडीएमसी क्षेत्रातील पलावा सिटीत देखील नागरिकांना कर आकारणीत कोणत्याही प्रकारची सवलत अद्याप केडीएमसी कडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी समिती गठीत करण्याचे तर पलावामधील नागरिकांना ६६% कर सवलत देण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू न केल्यास नागरिक कर भरणार नाहीत अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने पलावातील सदनिका धारकांना नियमानुसार कर सवलत देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. तर २७ गावातील नागरिकांकडून देखील दहापट कर आकरणीला २७ गाव संघर्ष समिती आणि आमदार राजू पाटील यांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत २७ गावातील कर आकारणीबाबत समिती नेमून पुनर्मूल्यांकन करण्याचा तर तसेच पलावामधील सदनिका धारकांना नियमाप्रमाणे ६६% सवलतीचे निर्देशन देण्यात आल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
त्यानुसार केडीएमसीने कर आकारणी करून बिले पाठवावीत, जेणेकरून केडीएमसीच्या अभय योजनेचा या नागरिकांनाही फायदा होऊन पालिकेचा थकीत कर वसूल होईल. परंतु तसे न झाल्यास २७ गाव आणि पलावामधील नागरिक कर भरणार नसल्याची भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी मांडली आहे.