कल्याण डोंबिवली दि.20 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीमध्ये विविध दुकानदार , व्यावसायिक आणि उद्योगांमार्फत झाडांवर लायटिंग (विद्युत रोषणाई) तसेच खिळे ठोकून बोर्ड लावण्यात आले आहेत. ही लायटिंग आणि खिळे ठोकलेले बोर्ड त्वरित काढण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले असून त्याला प्रतिसाद न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा कडक इशाराही केडीएमसीने दिला आहे. (Immediately remove lighting and nailed boards on trees or else face the legal action – KDMC warns)
झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची विद्युत रोषणाई करणे, जाहिराती लावण्यासाठी खिळे ठोकले असतील तर ते हटविणेबाबत मा. उच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही बऱ्याच ठिकाणी झाडांवर लायटिंग करण्यासह जाहिरातीही लावण्यात आल्या आहेत. केडीएमसी उद्यान विभाग तसेच प्रभागातील अतिक्रमण विभागाकडून गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीतील सुमारे 100 ठिकाणी झाडांवरील रोषणाई काढून टाकण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.
तसेच कल्याण डोंबिवली क्षेत्रात अनेक जणांना तातडीने लायटिंग आणि जाहिराती काढून टाकण्याच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. तसेच केडीएमसीच्या या आवाहनाला कल्याण डोंबिवलीतील अनेक व्यावसायिक आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःहूनच झाडांवरील लायटिंग, जाहिरात फलक काढल्याची माहितीही अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून या केडीएमसीच्या या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.