कल्याण – डोंबिवली दि.२५ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमध्ये सुरू असणारे अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांनी आज कल्याणात बैठक घेतली.
गेली २ वर्षे आधीच कोवीडमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणतेही उत्पन्न नसतानाही लाईट बिल, कामगारांचा पगार, शासनाचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. तर कोवीड निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक गाडा आताशी कुठे हालचाल करू लागला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीसह इतर शहरात सुरू झालेल्या अनधिकृत ढाब्यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आवाहन उभे केले असल्याचे यावेळी विविध हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
तर आम्ही सर्व जण शासनाचे रीतसर सर्व कर, देयके भरत आहोत. याउलट कोणतेही शासन शुल्क किंवा परवानगी घेता अनधिकृत ढाबे सर्रासपणे सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे? असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. तसेच या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
आम्ही दिसायला मोठे हॉटेल दिसत आहोत, अनेक जणांचा रोजगार, सरकारी टॅक्स, सर्व नियम पाळतो. जे अनधिकृत ढाबे आहेत त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय, हे ढाबे तातडीने बंद करावेत, एवढीच कळकळीची विनंती आहे – नरेश कंडारे, सचिव ,उल्हासनगर हॉटेल ओनर्स असोसिएशन.
कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, बदलापूर परिसरात अनधिकृत ढाबे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबत ठाणे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. अनधिकृत ढाब्यांमुळे लहान लहान हॉटेल व्यावसायिकांवर कठीण वेळ आलीय. आधीच कोवीड काळात मोठे नुकसान झाले आहे. आम्ही कर्ज घेऊन, घरदार गहाण ठेवून सरकारला लायसन्स फी, जी एस टी आदी कर भरत आहोत. त्यामुळे अनधिकृत ढाब्यांवर तातडीने कारवाई करावी – प्रविण शेट्टी, अध्यक्ष, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशन.