अडीच महिन्यांपासून भेट देत नसल्याने आमदार पाटील यांनी व्यक्त केला संताप
कल्याण दि.2 मार्च :
केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे व्यक्ती म्हणून खूपच चांगले आहेत, त्यांच्याशी माझे वैयक्तीक संबंधही चांगले आहेत. मात्र एक हितचिंतक म्हणून आपला त्यांना सल्ला आहे की ‘तुम्हाला झेपत नसेल तर इथून सोडून जा आणि तुम्हाला सोयीस्कर जी खुर्ची असेल ती पकडा असे सांगत कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांवर तोफ डागली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील केडीएमसीशी निगडीत विविध प्रश्नांबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संताप व्यक्त केला.
अडीच महिन्यांपासून आयुक्त भेटत नाहीयेत..
गेल्या अडीच महिन्यापासून आपण केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट मागत आहोत. आज त्यांनी भेटण्यासाठी वेळ दिली होती, मात्र डॉ. विजया सूर्यवंशी आज पालिकेत उपस्थित नसल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यामूळे आमदार पाटील यांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शहर अभियंत्या सपना कोळी यांच्यासोबत चर्चा करावी लागली. वेळ देऊनही आयुक्त भेटत नसल्याचे सांगत तुम्हाला जी सोयीस्कर खुर्ची असेल ती पकडा. कशाला आमचे आणि तुमचे आमचे हाल करून घेताय? अडीच अडीच महिने तुम्ही का भेटत नाही? त्याच्या मागे कोणाचा दबाब येतो का असे विविध सवालही आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. तर माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत, कलेक्टर म्हणूनही त्यांचे काम चांगले होते. त्यामुळे त्यांनी एखाद्या सिंगल खुर्चीचे काम शोधून ते उत्तमरित्या करावे, आपल्या त्यांना शुभेच्छा असतील. मात्र इथले काम सोडून त्यांच्या जागी एखादा कमी शिकलेला परंतु प्रॅक्टिकलरित्या काम करणारा अधिकारी पाहीजे असल्याचेही आमदार पाटील म्हणाले. तसेच कल्याण डोंबिवली ही जुळी शहरं असून आमच्या डोंबिवलीत हे अधिकारी पायही ठेवत नाहीत. आणि आम्हाला भेटही देत नसतील तर त्यांचे काहीही काम नाहीये. त्यांनी आमची आणि त्यांची सुटका करावी अशा शब्दांत आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन…
रस्त्यात बाधितांचे सहा दिवसापासून महापालिकेसमोर उपोषण सुरु होते. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत उपस्थित केला.13 बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. मात्र येत्या 2 महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही आमदार पाटील यांनी यावेळी दिला. डोंबिवली पश्चिमेसाठी वीजपुरवठा करणारे स्वतंत्र सबस्टेशन नाही. डोंबिवली पश्चिमेत सब स्टेशन उभारण्याकरीता महावितरणने जागेची मागणी केली होती. ती जागाही उपलब्ध करुन देण्याची भूमिका आजच्या बैठकीत प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
जागा खाली न केल्यास साहित्य बाहेर फेकण्याचा इशारा…
कोरोना काळात गुजराती समाजाने पुढे येऊन पाटीदार भवनाची जागा महापालिकेस उपलब्ध करून दिली. 6 महिन्यांपूर्वी हे इथले कोवीड रुग्णालय केडीएमसीने बंद केले आहे. मात्र त्याठिकाणी असलेले रुग्णालयाचे साहित्य तसेच धूळ खात पडून आहे. पाटीदार भवन व्यवस्थापनातर्फे केडीएमसीला आतापर्यंत 8 वेळा पत्र पाठवली. परंतू केडीएमसी प्रशासनाने अद्याप त्याची कोणतीच दखल घेतली नाहीये, महापालिकेने कोरोना संपल्याचे जाहिर करून त्यांची जागा परत करण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. तसेच केडीएमसीकडून अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल तर भविष्यात पुन्हा गरज लागल्यास कोणी कसं काय जागा देईल? केडीएमसीने इथली जागा खाली करून दिली नाही तर मनसे त्याठिकाणचे साहित्य बाहेर फेकून देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या बैठकीला मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, शहराध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक राजन मराठे आणि विविध पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.