Home ठळक बातम्या केवळ लेटर देऊन कामं होत नसतात तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो –...

केवळ लेटर देऊन कामं होत नसतात तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

डोंबिवली दि.17 फेब्रुवारी :
आपण केवळ लेटर दिलं किंवा कुठे काही केलं म्हणून विकासकामं होत नसतात. तर कुठलाही प्रकल्प आणण्यासाठी खूप कष्ट आणि पाठपुरावा करावा लागतो असा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला. डोंबिवली एमआयडीसी येथील टप्पा क्रमांक 1 – मधील 45 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक निवासी विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार होता. 2 वर्षे अगोदर आम्ही याची सुरुवात केली, पाठपुरावा केला. एमआयडीसी अधिकारी, मंत्र्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिले. इथले रस्ते होणे खूप गरजेचे आहे हे समजवून सांगितले. कारण ग्रामपंचायत, महापालिका – ग्रामपंचायत, महापालिका असे आत बाहेर केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय. तर इकडे मतांवर डोळा ठेऊन काम न करता इथल्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आम्ही आश्वासन नाही तर वचन देतो…
फक्त आम्ही कुठलेही आश्वासन देत नसतो. शिवसेना हा वचन देतो आणि आज ही वचनपूर्ती आहे. शिवसेनेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आम्ही जे बोलतोय ते करतोय. आपल्याला कोणावर टिका करायची नाहीये. पण या कल्याण डोंबिवलीचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. जास्तीत जास्त निधी एमएमआर रिजनमध्ये कसा येईल यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले. तर काटाई ऐरोली अंडरपास झाल्यावर आणि पलावा इथला उड्डाणपूल झाल्यानंतर पत्रीपुल, दुर्गाडी पुलाप्रमाणे तिथली वाहतूक कोंडी समस्या दूर होईल. सहा पदरीकरण काम पूर्ण झाल्यावर भिवंडीपर्यँतची वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या सरकारनंतर एमएमआर रिजनसाठी मोठ्या प्रमाणात निधी येण्यास सुरुवात झाली असून कल्याण लोकसभेतील प्रत्येक गल्ली सिमेंट काँक्रीटची करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

कुठलाही प्रोजेक्ट आणण्यासाठी खूप कष्ट आणि पाठपुरावा करावा लागतो…
कोणताही निधी आणण्यासाठी किंवा प्रकल्प आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पायपीट करावी लागेल, प्रत्येक अधिकाऱ्याला भेटावे लागते, प्रत्येक मंत्र्यांना याचना करावी लागते. त्यानंतर कुठे हा निधी प्राप्त होतो. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत म्हणून आपल्याला निधी लगेच मिळालेला नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करावा लागतो, फक्त आपण लेटर दिलं, कुठे काही केलं म्हणून कामं होत नसतात, नाही तर आपल्या आधी कल्याण डोंबिवलीत कामं झाली असती असा सणसणीत टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला. तसेच एमआयडीसीतील रस्त्यांची कामं सुरू झाल्यावर काही लोकं अभिनंदनाचे बॅनर लावणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच आता ते आपल्या बोलण्यावर ठाम राहतील, यात तिळमात्र शंका नसल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा