खासदार म्हात्रे यांनी कल्याण स्टेशनची पाहणी करत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कल्याण दि.15 जुलै :
रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी. आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दांत भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली. त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.(If the situation in the Kalyan station area is not improved)
कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता, प्रवशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, एफओबीवर पंखे बसवणे, वेटींग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. ज्याची उत्तरे देताना रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडल्याचे दिसून आले. कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर स्वच्छतागृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकीकरण करायचे आहे? प्रवाशांच्या स्वच्छतागृहापेक्षा सलून इतके महत्त्वाचे आहे का असा संतप्त सवाल केला.
तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले, देहविक्रिय करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना माना खाली घालून त्याठीकाणावरून जावे लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचे केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सांगितले की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही, तर चौथ्या वेळी त्या अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी. कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दांत खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.
यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन बासरे, रूपेश भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.