Home ठळक बातम्या खासदार श्रीकांत शिंदे तोफ घेऊन येतील तर आपण फायटर प्लेन आणू –...

खासदार श्रीकांत शिंदे तोफ घेऊन येतील तर आपण फायटर प्लेन आणू – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

 

कल्याणात झाले स्मार्ट रस्त्याचे भूमीपूजन

कल्याण दि.13 एप्रिल :
कल्याणात स्मार्ट सिटीअंतर्गत नौदल संग्रहालय साकारण्यात येणार असून त्यामध्ये युद्धनौका ठेवण्यात येणार आहे. केडीएमसी आयुक्तांनी प्रस्ताव पाठवल्यास मी आणि श्रीकांत शिंदे दोघे मिळून या संग्रहालयासाठी संरक्षण मंत्रालयाकडून तोफ आणि फायटर प्लेन घेऊन येऊ असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. कल्याण पश्चिमेत मंगेशी सृष्टी ते रौनक सिटीपर्यंत स्मार्ट रस्ता उभारण्यात येत असून त्याच्या भूमीपूजनप्रसंगी पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला.

स्मार्ट सिटीतून उभारण्यात येत असलेल्या नौदल संग्रहालयासाठी केडीएमसी आयुक्तांनी फायटर विमान, तोफेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही देतानाच राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की आपण आणि श्रीकांत शिंदे मिळून एक जण तोफ घेऊन येईल तर एक जण फायटर प्लेन घेऊन येईल असे सांगितले.

या भूमीपूजन सोहळ्यादरम्यान काही काळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचा धागा पकडत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की थोडेसे सबुरीने घेतलं पाहिजे, कोणाचे कोंबडे बांग देतोय हे महत्वाचे नाही तर आपला दिवस उजाडतोय हे महत्वाचे आहे. इकडे आम्ही दोघेही मस्त गप्पा मारतोय आणि तिकडे तुम्ही कशाला घोषणाबाजी करताय? असा सवाल उपस्थित केला.

तर आपल्या मनातील संकल्पनेप्रमाणे केडीएमसी आयुक्तांकडून कल्याणचा खाडी किनारा विकसित केला जात आहे. इथला कचऱ्याचा डोंगर हटला की याठिकाणी वृंदावन गार्डनप्रमाणे सुंदर उद्यान विकसित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी हे चांगले मित्र असून स्मार्ट सिटी योजनेतील उर्वरित दोन हफ्ते केडीएमसीला लवकरात लवकर देण्यासाठी त्यांच्याशी बोलू असेही कपिल पाटील यांनी सांगितले.
.
कल्याण शहराच्या विकासाबरोबरच वेगवान वाहतुकीसाठी भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्गाचे काम लवकर सुरू करावे. कल्याण शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी `एमएमआरडीए’मार्फत आणखी ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही राज्यमंत्री पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

कल्याण डोंबिवलीत सुरू असणाऱ्या मोठ्या प्रकल्पांमुळे चेहरा मोहरा बदलणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत 1 हजार कोटींहून अधिक निधीची विकासकामे सुरू आहेत. ती येत्या काळात पूर्णत्वास जाणार असून त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलण्यास मोठी मदत होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याणात जिथे जिथे शक्य आहे तिकडे आज काम सुरू आहे. कमांड आणि कंट्रोल सेंटर, सीसीटिव्ही, सिग्नल यंत्रणा, रिंग रोडसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहेत. केडीएमसीमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इथल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत शाश्वत विकासासाठी सर्व जण कार्यरत असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काढले. तर नौदल संग्रहालयासाठी आपण संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांची भेट घेऊन ट्रॉफीसाठी मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आपणही खारीचा वाटा उचलणार – आमदार गणपत गायकवाड…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण पूर्वेत होणारे स्मारक हे अत्यंत अभिमान आणि आनंदाची बाब आहे. हे स्मारक व्हावे म्हणून याठिकाणी अनेक आंदोलने झाली. आणि आज या स्मारकाचे भूमीपूजन होणारे भूमीपूजन होतेय, यामध्ये आपलाही खारीचा वाटा म्हणून आमदार निधीतील 50 लाखांचा निधी त्यासाठी वापरावा अशी विनंती कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त विजय सुर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रल्हाद रोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा