कल्याणचे ग्रामदैवत दुर्गाडी देवीचे घेतले दर्शन
कल्याण दि.28 ऑक्टोबर :
सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन इथली जनता आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावू अशा शब्दांत शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल विश्वनाथ भोईर यांनी कल्याणचे ग्रामदैवत असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गादेवीचे दर्शन घेत एबी फॉर्म तिच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.(I will certainly repay the trust of the people and the party leadership – Shiv Sena candidate Vishwanath Bhoir)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला. गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याकडून झालेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी देत आपल्यावर विश्वास दाखवला असल्याचे भोईर यांनी यावेळी सांगितले.
तर गेल्या 2091 च्या निवडणुकीत ज्यावेळी एबी फॉर्म मिळाला होता. तेव्हा आपण किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव समितीचे अध्यक्ष होतो. देवीचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने ही आठवण मनामध्ये ठेवून आज पुन्हा एकदा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कल्याणकर जनतेने दाखवलेला विश्वास आणि सर्वांचे सकारात्मक सहकार्य उभे राहिल्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला असून आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाहीही विश्वनाथ भोईर यांनी दिली.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, दुर्योधन पाटील, विद्याधर भोईर, गोरख जाधव, युवासेनेचे सुचेत डामरे, प्रतिक पेणकर वैभव भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या सकाळी भरणार उमेदवारी अर्ज…
उद्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही भोईर यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी खडकपाडा येथून ते मुंबई विद्यापीठ उपकेंद्रापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात येणार असून त्याद्वारे आपला जीव अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.