तर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करणे ही केवळ औपचारिकता
कल्याण दि.7 एप्रिल :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या सगळ्या महायुतीचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूका लढतो. मोदीजींना देशात केलेले प्रचंड काम आहे. त्या कामामुळे आपल्यासमोर कोणत्याही उमेदवाराचे आव्हान आहे असे वाटत नसल्याचे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.
मोदीजींच्या कामावर जनतेचा विश्वास…
ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे त्यात भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आदी घटक पक्ष आहेत. या सगळया महायुतीचा मी उमेदवार असून याआधीही आपण दोन वेळा महायुतीचाच उमेदवार होतो. महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी मोदीजींच्या कामावर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या माध्यमातून जनता पुन्हा एकदा निश्चितपणे आपल्याला निवडून देईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करणे ही केवळ औपचारिकता…
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याबाबत ते म्हणाले की ही केवळ औपचारीकता होती, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहिर केली असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षातील नेते – कार्यकर्त्यांची ती भूमिका योग्य नाही…
एकदा आपल्या नेत्यांनी युती केल्यानंतर पक्षातील नेते – कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे उचित नाही. आपल्या काही भावना असतील तर त्या आपल्या नेत्यांपर्यंत पोचविल्या पाहिजेत. महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयांतून जी काही समस्या असेल तिचे निराकरण केले पाहिजे. मात्र जाहीरपणे अशा प्रकारची वाच्यता करणे उचित नाही. भाजप असो की, शिवसेना असो आपली महायुती आहे. महायुती हे आपले कुटुंब आहे. आपल्या कुटुंबात त्याची चर्चा होणे गरजेचे असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.
तर आम्ही शिवसेनेचे काम करु…
भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मागणी शिवसेनेने केली आहे. महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, सुनिल तटकरे आहे. यांच्या समन्वयाच्या बैठकीत आमच्या सहकाऱ्यांना ती जागा शिवसेनाला मिळाली, तर दहा वर्षे त्यांनी आमचे काम केले आत्ता आम्ही त्याचे काम करु. यात चुकीचे काय ? लोकशाहीत त्यांनी जागा मागितली आहे. त्यात चुकीचे काही नाही. देशाचे आणि राज्याचे शीर्ष नेतृत्व हे निर्णय करतील अशी प्रतिक्रियाही खासदार कपिल पाटील यांनी यावेळी दिली.