निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात केली भूमिका स्पष्ट
कल्याण दि.10 ऑगस्ट :
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने भाजपला ही जागा जाईल असे वाटत नाही. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. (I am the main contender from Kalyan West – MLA Vishwanath Bhoir)
कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पत्रकारांची संघटना असेलल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील आव्हान, मतदारसंघात झालेली विकासकामे, राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर बदललेले चित्र, महायुतीतील घटक पक्ष आदी महत्त्वाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. तर कोवीड काळात गमावलेल्या राजेंद्र देवळेकर, दिपक सोनाळकर, प्रकाश पेणकर या आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणीने ते काहीसे भावूक झाल्याचेही दिसून आले.
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि भरीव निधी आला…
आपण आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच्या पुढच्या काही महिन्यात कोवीडने संपूर्ण जग व्यापून टाकले. मात्र त्याकाळातही लोकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र खरे सांगायचे तर आमचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यानंतर कल्याण पश्चिमेत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ कल्याण पश्चिमच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात कामाची गती प्राप्त झाल्याचे सांगत आपल्याला मिळालेल्या कार्यकाळात लोकांसाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.
यंदा कल्याण पश्चिमेत नवा इतिहास घडणार…
कोविडमुळे आमदार म्हणून काम करण्यासाठी पूर्ण पाच वर्षांचा वेळ मिळू शकला नाही. आणि आपण 100 टक्के सगळी कामे केली आहेत असेही आपले अजिबात म्हणणे नाहीये. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर खऱ्या अर्थाने विकासकामांना गती मिळाली. एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये घेतलेले लोकाभिमुख निर्णय आणि आपण केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. या कामांच्या बळावर जनता आपल्याला नक्कीच पुन्हा एकदा निवडून देईल. आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये नविन इतिहास लिहिला जाईल असा विश्वासही आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदारकीची इच्छा व्यक्त करणे गैर नाही…
तर कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढवण्याची पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्याची पुढे जाण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे आमच्या पक्षातील सहकाऱ्यांनी व्यक्त केलेली मतं काही गैर नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केल्यावर त्यावर कोणीही नाराजी व्यक्त करणार नाही. सर्व जण एकजुटीने त्या उमेदवारासाठी काम करतील असेही आमदार भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.
मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, स्वतंत्र धरण, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि स्वच्छ कल्याणला प्राधान्य…
गेल्या दोन अडीच वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील विकासकामांना खऱ्या अर्थाने गती आली आहे. राज्य सरकारकडून भरीव असा निधी या मतदारसंघासाठी देण्यात आला असून याठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, स्वतंत्र धरण, सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि स्वच्छ कल्याण या विषयाला आपण अधिकाधिक प्राधान्य देत आहोत. या कामांना निश्चितपणे काहीसा कालावधी लागणार असला तरी त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील मतदार आपल्याला यासाठी नक्कीच आणखी एक संधी देतील असे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.