Home ठळक बातम्या Humanity is still Alive : कल्याणात माणुसकी जपत साजरे झाले “थर्टी फर्स्टचे...

Humanity is still Alive : कल्याणात माणुसकी जपत साजरे झाले “थर्टी फर्स्टचे अनोखे सेलिब्रेशन”

संवेदनशील तरुण वर्गाकडून सेलिब्रेशनला फाटा देत त्या खर्चातून गोर गरिबांची मदत

कल्याण दि.1 जानेवारी :
थर्टी फर्स्ट म्हणजे दारूच्या पार्ट्या, थर्टी फर्स्ट म्हणजे नुसतेच सेलिब्रेशन, थर्टी फर्स्ट म्हणजे निव्वळ खाण्या पिण्याची चंगळ, थर्टी फर्स्ट म्हणजे बेभान होण्याचं आणखी एक निमित्त…या आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या शब्दांमध्ये नववर्ष स्वागताचे वर्णन करता येईल. मात्र यासोबतच कल्याणात थर्टी फर्स्टचे एक असे अनोखे सेलिब्रेशन झाले ज्यातून माणुसकी आणि समाजभानही जपल्याचे दिसून आले. (Humanity is still Alive: “Unique Celebration of Thirty First” in Kalyan)

थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर म्हणजे जुने वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षाचा हा शेवटचा दिवस अनेक जण आपापल्या पध्दतीने साजरा करतात. मग काही जण आपल्या मित्र मंडळींसोबत जंगी पार्टीद्वारे सेलिब्रेशनचे बेत आखातात तर काही जण पर्यटनस्थळी जाऊन आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवतात. पण कल्याणातील काही संवेदनशील तरुणांनी साजरा केलेला हा थर्टीफर्स्ट काहीसा हटके आणि समजाभान जपण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला. थर्टीफर्स्टच्या जंगी सेलिब्रेशन टाळत त्या पैशांतून गोरगरिबांना मदत करण्यात आली.

कल्याणातील ‘Humanity is still alive (‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’) या ग्रुपतर्फे हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या ग्रुपचे तेजस रमेश सांगळे, मुकुल श्रीकांत सोनटक्के, आदित्य शिरीष लासुरे, सुधीर शेट्टी शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर आणि अन्य सहकाऱ्यांमार्फत थर्टी कल्याण आणि आसपासच्या परिसरात फुटपाथवरील गोर गरिबांना खाद्य पदार्थ आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती या संस्थेचे तेजस सांगळे याने दिली.

एकीकडे आपल्याकडची तरुणाई बेधुंदपणाच्या सेलिब्रेशनची व्यसनाधीन होऊ लागल्याची टिका होत असताना दुसरीकडे कल्याणातील Humanity is still alive (‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’) या ग्रुपच्या माध्यमातून हीच तरुणाई आपले समाजभान आणि आपली सामाजिक जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे निभावत असल्याचे दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा