अनेक जागरूक नागरिक झाले सहभगी
कल्याण दि.1 मे :
सध्या निर्माण झालेले दुहीचे वातावरण निवळून समाजात शांतता संवाद टिकून राहण्यासाठी कल्याणात जागरूक नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी तयार केलेली पाहायला मिळाले. कल्याण पश्चिमेच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या मानवी साखळीमध्ये ना कोणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली की ना कोणाविरोधात बॅनरबाजी. केवळ पांढरे शुभ्र कपडे आणि कोणताही मजकूर नसणारा पांढरा शुभ्र बॅनर हाती धरून आगळ्या पद्घतीने या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या समाजात जाती – धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तसेच समाजिक तणाव वाढवण्याचे प्रयत्न वाढत चालल्याचे या आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र त्याच वेळेला सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही आपली सामाजिक मूल्ये असून समाजतील कोणताही प्रश्न सोडवण्याचा मार्ग हा परस्पर संवादाचा असतो, याला अनुसरून आम्ही हे शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्याची माहिती जागरूक नागरिक सुहास कोते यांनी दिली. तसेच ही मानवी साखळी कोणत्याही संघटनेची , पक्षाची किंवा व्यक्तीची नसून समाजातील प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणिव करुन देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे मतही सहभागी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
यामध्ये मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ. सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते.