माजी आमदार नरेंद्र पवार – हेमा पवार यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिकेची निर्मिती
कल्याण दि.13 जानेवारी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीने आतापर्यंत देशाला अनेक महनीय व्यक्ती दिल्या आहेत. मात्र काळाच्या ओघात या महनीय व्यक्ती लोकांच्या स्मृतीतून नामशेष होऊ नयेत यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या शहराप्रती असणारे दायित्व लक्षात घेत पवार दांपत्याने दिनदर्शिकेच्या माध्यमातून या महनीय व्यक्तींच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.(Honoring Kalyan dignitaries through the calendar; Released during the BJP session)
शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान भाजपच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
कल्याण…ऐतिहासिक वारसा आणि पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील निवडक प्राचीन ठिकाणांपैकी एक ठिकाण. हिंदवी स्वराज्याची निर्मिती असो की देशाचा स्वातंत्र्यलढा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्र असो की उद्योग – कला. या ऐतिहासिक कल्याण नगरीने नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक रत्नं दिली आहेत. मात्र काळाच्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या ओघात ही रत्नं काहीशी विस्मृतीच्या पडद्याआड जाण्याची भिती निर्माण झाली होती. आणि त्यातूनच मग दिनदर्शिकेच्या माध्यमातून या महनीय व्यक्ती, त्यांचे कार्य आणि आपल्या शहरासाठी असणारे योगदान लोकांच्या घराघरात पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
या दिनदर्शिकेमध्ये पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव झुंजारराव, प्रा. राम कापसे, भगवानराव जोशी, दत्तात्रय धोंडीबा कदम, शिल्पकार भाऊ साठे, कृष्णराव धुळप, माधवराव काणे, मूर्तिकार विठ्ठल ईश्वाद, भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य, सुप्रसिद्ध उद्योजक डी.पी. लोहार अर्थातच दत्तात्रय पांडुरंग पिंपळे अशा विविध क्षेत्रातील 12 विभूती आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे. ज्यातून या व्यक्तींच्या कार्याच्या पाऊलखुणा जपल्या जाण्यासोबतच नव्या पिढीलाही आपला हा वारसा माहिती होणार आहे.
या महनीय व्यक्तींनी आपापल्या कालखंडात केलेल्या भरीव कामगिरीची माहिती नव्या लोकांसमोर, नव्या पिढीसमोर जाणे आवश्यक होते. ज्या शहराने आपल्याला आज नाव दिले, ओळख दिली त्या शहराप्रती असणारे आपले दायित्व ओळखूनच आपण हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी हेमा पवार यांनी दिली आहे. तसेच या महनीय व्यक्तींनी आपापल्या संबंधित क्षेत्रात केलेलं काम आणि त्यातून गाठलेली उंची कोणीही नाकारू शकणार नाही. त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, नगविकास परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशनही करण्यात आले.