Home कोरोना प्रामाणिकपणा अद्याप जिवंत आहे; परिस्थितीने गरीब आजीबाईंनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीचे होतेय कौतुक

प्रामाणिकपणा अद्याप जिवंत आहे; परिस्थितीने गरीब आजीबाईंनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीचे होतेय कौतुक

 

कल्याण दि.१६ एप्रिल :
फुटपाथवर वस्तू विकून कसाबसा आपला उदर निर्वाह चालवणाऱ्या आजीबईंची सध्या कल्याणात जोरदार चर्चा आहे. परिस्थितीने गरीब असूनही या आजीबाईंनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीचे आणि प्रामाणिकपणाचे मोठे कौतूक होतेय. या आजीबाईंनी रस्त्यावर सापडलेले थोडे थोडके नव्हे तर तब्बल २ लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट परत करत प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचे दाखवून दिले.

कल्याण स्टेशनजवळील एसीपी कार्यालयाला लागून असणाऱ्या फुटपाथवर जाहीदा शेख या ६० वर्षांच्या आजीबाई झाडू, केरसुणी, सुपली आदी वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या गुरुवारी नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करीत असताना त्यांना रस्त्यावर पिवळ्या रंगाची वस्तू पडलेली दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन ती वस्तू उचलली असता ही काही साधीसुधी नव्हे तर सोन्याचा महगडा दागिना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरची हलाखीची परिस्थिती, पैशांची चणचण असतानाही ही वस्तू आपल्याजवळ ठेवण्याचा यत्किंचितही विचार आला नाही. त्यांनी समोरच चौकात उभ्या असणाऱ्या ट्रॅफिक पोलिस विठोबा बगाड, बाळू सावकारे, वॉर्डन संतोष घोलप आणि सत्यजित गायकवाड यांना हा प्रकार सांगितला.

त्यांनी जाहिदा शेख यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्याकडे नेले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान तरडे यांनीही आपल्या कर्मचाऱ्याना चौकात आणि नाश्ता केंद्रात कोण कोण आले होते याची माहिती काढण्यास सांगितले. त्याचवेळी एक व्यक्ती हे ब्रेसलेट शोधण्यासाठी या परिसरात आला असता वाहतूक पोलिसांकडे आपले सोन्याचे ब्रेसलेट असल्याचे त्याला समजले. त्याने वाहतूक पोलीस निरीक्षक महेश तरडे यांची भेट घेतली आणि आपले सोन्याचे ब्रेसलेट हरवल्याचे सांगितले. त्यावर वाहतूक पोलिसांनी त्याची शहानिशा करत या तरुणाला हे ब्रेसलेट परत केले.

दरम्यान या सामान्य आजीबाईंनी दाखवलेल्या असामान्य प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक पोलिसांनीही त्यांचा सत्कार केला

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा