कल्याण दि.18 जानेवारी :
सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर मध्य रेल्वेने कळवा आणि कल्याण (पूर्व) तसेच डोंबिवली येथील रेल्वेच्या जमिनींवरील वसाहतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मात्र गेल्या ३० ते ४० वर्षांपासून ही घरे असून कोरोनाची लाट सुरू असताना त्यांना बेघर करणे योग्य नसून ही घरे संरक्षित असल्यामुळे त्यांच्या योग्य पुनर्वसनासंदर्भात निर्णय करण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची विनंती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या देशभरात अनेक ठिकाणी जमिनी असून त्यातील काही जमिनींवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने या जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात येत आहे. ही बाब कळताच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली. तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. शासकीय धोरणानुसार हे रहिवासी पुनर्वसनास पात्र आहेत. तसेच, सध्या सुरू असलेली कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता त्यांना अशा परिस्थितीत बेघर करणे योग्य नाही असे सांगून पुनर्वसनाबाबत धोरण निश्चित करण्यासाठी त्वरित बैठकीचे आयोजन करण्याची विनंती डॉ. शिंदे यांनी केली. त्यावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही विनंती मान्य केली असून पुढील आठवड्यात सर्व संबंधितांच्या बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही दिली आहे.
यासंदर्भात खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मा. न्यायालयाच्या आदेशाचा संपूर्णपणे आदर राखण्यात येईल. परंतु कळवा एबी कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथे रेल्वेच्या जमिनींवरील वसाहती ३० ते ४० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी रेल्वे, राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिका यांची संयुक्त बैठक होण्याची गरज आहे. त्यानुसार राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली असून त्यांना नोटिसा देण्याचे काम थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्याबाबतही विनंती केली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात बैठक घेण्याची ग्वाही दानवे यांनी दिल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.