ठाणे दि.12 जानेवारी :
‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षी मृत पावल्याच्या घटनांची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून नागरिकांच्या यासंदर्भातील तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. कावळे, पोपट,बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास तसेच व्यावसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती देण्यासह जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 022-25603311 तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री 18002330418 या क्रमांकावर त्वरीत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय यंत्रणेची आढावा बैठक झाली.
नागरिकांनी मृत पक्षांचे शवविच्छेदन करु नये…
नागरिकांनी मृत पक्षांचे शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी केले आहे. तर बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या आणि चुकीच्या माहितीवर कोणी दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी दिला आहे.
जनतेने घाबरून जाऊ नये…
ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत संपूर्ण आरोग्य यंत्रणा विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणा अधिक सतर्क असून याबाबत योग्य ती खबरदारी, उपाययोजना केल्या जात आहेत. जनतेने घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 7 रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त…
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 7 रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या माध्यमातुन प्राधान्याने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पशु वैद्यकीय विभागाबरोबरच ग्रामपंचायत तसेच वनविभाग पातळीवरही निगराणी ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्याठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला करण्यात आल्या.
तक्रारींसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित…
तर याबाबत तक्रारींसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं कामकाज चालणार आहे. या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन शासनाच्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करण्याबाबतच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिल्या.
विक्रेत्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना…
पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्ती मास्क आणि सॅनिटायझर तसेच स्वच्छता पाळतील याची दक्षता घ्यावी. तसेच किरकोळ आणि होलसेल विक्रेत्यांनीही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अंडी आणि कोंबडीचे मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अशा पध्दतीने अंडी, मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे ते म्हणाले.