Home ठळक बातम्या हिटवेव्ह अलर्ट : उद्यापासून पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

हिटवेव्ह अलर्ट : उद्यापासून पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

तापमानाचा पारा 42 – 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली दि.9 :
आताशी मार्च महिन्याचा पहिला आठवडाही उलटला नसतानाच त्याच्या आधीपासूनच उन्हाच्या झळांनी डोक्याला ताप द्यायला सुरुवात केली आहे. त्यातच आता उद्यापासून (सोमवार 10 मार्च ) पुढील तीन दिवस आपल्याकडे उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये तापमानाचा पारा थेट 42 – 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी वर्तवली आहे.

यंदा तर जेम तेम फेब्रुवारी महिनाही अर्धा उलटला नसतानाच तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली. इतकेच नाही तर फेब्रुवारी महिना संपता संपताच यंदाच्या हंगामातील पहिली उष्णतेची लाट (Heat wave) कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अनुभवायला मिळाली. सरासरी 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहणारा तापमानाचा पारा या हिट वेव्हमुळे थेट 40 अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याचे दिसून आले.

तर मार्च महिना उजाडता उजाडताच पहिल्याच आठवड्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले. 7 मार्च रोजी कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील पहिल्या 40 अंशी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

तसेच उन्हाच्या पाऱ्याचा हा चढता आलेख असाच सुरू राहणार असून उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून ते बुधवारपर्यंत कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या शहरातील तापमानाचा पारा 42 – 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

हवामान शास्त्रीयदृष्ट्या, मार्च महिन्यात भारतीय उपखंडावर प्रतिचक्रवाती (अँटिसाक्लोनिक) प्रणाली तयार होणे सामान्य आहे, कारण या काळात हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे ऋतुबदल होतो. या प्रणालीमुळे उत्तर/ईशान्येकडून कोरडे, उष्ण वारे वाहू लागतात. हे वारे, पश्चिमेकडील शीतल सागरी वाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे, तापमान सरासरीपेक्षा ४-५ अंश सेल्सिअसने वाढवत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले.

सामान्यपणे, उन्हाळ्यातही, मार्च महिन्यात कोकणातील अंतर्गत भागातील तापमान साधारणपणे ३६-३८°C च्या दरम्यान असते. याचे कारण म्हणजे हा प्रदेश जमिनीने वेढलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून २० ते ४० किमी अंतरावर आहे, ज्यामुळे सागरी वारे फारसे आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत. शांत वातावरणामुळे जमीन लवकर तापते, ज्यामुळे तापमान वाढत असल्याचेही ते म्हणाले.

तर उष्णतेच्या लाटेदरम्यान, हे आधीच वाढलेले तापमान सरासरीपेक्षा आणखी ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढत असल्याने तापमानाचा पारा ४२-४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी व्यक्त केली आहे.

आजचे कमाल तापमान 🌡️

कल्याण ४०.८ सेल्सियस
डोंबिवली ४०.६

मुंबई ३४.८
विरार ३६.६
पालघर ३८.४
नवी मुंबई ३८.९
तलासरी ३९.४
ठाणे व बादलपूर ३९.८
पनवेल ३९.९
खारघर ४०.२
मनोर ४०.३
मुंब्रा ४०.७
उल्हासनगर ४०.९
पलावा ४१.३
कर्जत ४१.७
मुरबाड ४२.३

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा