
कल्याण डोंबिवली दि.29 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले असताना उष्णतेच्या लाटेने सर्वानाच घाम फोडला आहे. शनिवार आणि रविवारी असे विकेंडचे सलग दोन्ही दिवस कल्याण डोंबिवलीकरांसाठी चांगलेच तापदायक ठरले. या दोन्ही दिवशी कल्याणात तापमानाच्या पाऱ्याने बेचाळीशी (42+) ओलांडल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या असह्य झळा जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पस्तीशी ते चाळीशीच्या आतमध्ये असलेल्या पाऱ्याने दोनच दिवसांत चाळीशी ओलांडली. आणि पुन्हा एकदा भयानक अशा उकाड्याने लोकांना हैराण करण्यास सुरुवात केली.
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात उष्णतेच्या लाटेमुळे सलग दोन दिवस 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. कल्याण डोंबिवलीत शनिवारी 41.7 तर रविवारी त्यापेक्षा एक डिग्री अधिक म्हणजे 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
तर आज आणि उद्या असे पुढील दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले रविवारचे तापमान…
कल्याण 42.7
डोंबिवली 42.6
मुंबई 38.1
मिरा रोड 39.8
विरार 41
नवी मुंबई 42
पालघर 42
तलासरी 42.2
मुंब्रा 42.3
मुलुंड 42.4
ठाणे 42.4
कळवा 42.6
बदलापूर 42.6
मनोर 42.6
धसई 42.7
भिवंडी 42.8
कर्जत 44
मुरबाड 44.2