
हिट वेव्हमुळे पुढील 4 दिवस जाणवणार उन्हाच्या झळा
कल्याण डोंबिवली दि.24 फेब्रुवारी :
एकीकडे फेब्रुवारी महिना संपायला आणखी चार दिवस शिल्लक असतानाच आतापासूनच वातावरणातील बदलांचे चांगलेच परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आजपासून पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा (HEAT WAVE) अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजच्या तापमानातूनच या हिट वेव्हची एक झलक पहायला मिळाली. कल्याणमध्ये आज 39.2 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत 39.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जाणवू लागलेली गुलाबी थंडी केव्हाच गायब झाली. मात्र तरीही वातावरणात तितकीशी गर्मी जाणवत नसल्याने आणि विशेषतः घाम येत नसल्याने नागरिकांना काहीसा फरक जाणवला नाही.
नियमाप्रमाणे, फेब्रुवारी महिना हा हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जाणारा संक्रमण काळ समजला जातो. ज्यामध्ये तापमान अनेकदा 35° सेल्सिअसच्या वर जात असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना (www.localnewsnetwork.in) दिली.
तथापी यावर्षी नेहमीच्या तुलनेत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. जानेवारीपासूनच आपण सातत्याने सरासरीपेक्षा अधिक तापमान अनुभवत आहोत आणि हीच स्थिती फेब्रुवारीमध्येही कायम असल्याचा ठळक बदल मोडक यांनी स्पष्ट केला आहे.
हे बदल प्रामुख्याने पश्चिमी विक्षोभ दीर्घकाळ अनुपस्थितीमुळे झाले आहेत, ज्यामुळे या प्रदेशावर परिणाम झाला नाही. परिणामी, प्रतिचक्रवाती (अँटिसायक्लोनिक) परिस्थिती नेहमीपेक्षा लवकर निर्माण झाली. सामान्यतः, हे पश्चिम वारे वरच्या स्तरावर द्रोणी (ट्रफ) तयार करून प्रतिचक्रवातांना विस्कळीत करतात. परंतु यावर्षी असे घडले नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच म्हणजेच नेहमीपेक्षा लवकर उष्णता जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर हवामान शास्त्रीयदृष्ट्या, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई MMR मध्ये 38 ते 39°सेल्सिअसपर्यंत तापमान असणे हे असामान्य नाहीये. कारण हा काळ उन्हाळ्याकडे सरकण्याचा असल्याने यावर्षीचा मुख्य फरक म्हणजे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात ३६° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवल्याचे दिवस लक्षणीयरीत्या वाढले आहेत. हे वाढलेले प्रमाण थेट पश्चिम वाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीशी संबंधित आहे, ज्यांनी जानेवारीपासून महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम केला नसल्याचेही हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी स्पष्ट केले.
एरव्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये किनारी भागात सरासरी ३२ ते ३४ अंश सेल्सिअस आणि अंतर्गत कोकणात ३४ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जाते. मात्र यासर्वच ठिकाणी यंदा नेहमीपेक्षा तब्बल ४ अंश ते ७ अंश सेल्सिअसने तापमान अधिक असल्याने उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आल्याचेही मोडक यांनी सांगितले.
आज नोंदवण्यात आलेले तापमान…
कल्याण 39.2
डोंबिवली 39.4
बदलापूर 38.9
ठाणे 38.9
उल्हासनगर 39.3
कर्जत 39.8
मुंबई 38.4
नवी मुंबई 39.1
पनवेल 39.4
विरार 39.1
पालघर 39.6