कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना
कल्याण दि.25 मार्च :
इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पूर्वेच्या कैलास नगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेला जबाबदार बिल्डरवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.
कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात राहणारा रेहान शेख शनिवारी सकाळी शाळेतून परतताना तो कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेवर खेळत होता. त्या ठिकाणाच्या जवळच इमारतीसाठी हा खड्डा खणून ठेवण्यात आला होता. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बॉल पडल्याने तो काढण्यासाठी रेहान प्रयत्न करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावेळी तोल जाऊन तो या खड्ड्यातील पाण्यात पडला. हा सर्व प्रकार ज्यांच्या डोळ्यांदेखत घडला त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेहानला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
तर काही वेळातच याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बेपत्ता रेहानला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेहानला शोधून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूपच उशिर झाल्याने सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
पाण्यात पडल्यावर या खड्ड्यातील गाळात रुतून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. तसेच याठिकाणी खड्डा खणून सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करण्याची संतप्त मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.