कल्याण – ठाकुर्ली दरम्यान पत्रीपुलाजवळील घटना
कल्याण दि.१९ जुलै :
कल्याणच्या पत्रिपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या घटनेने कल्याण डोंबिवलीसह सर्वच जण हळहळले. ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या चार महिन्यांचे बाळ हातून निसटले आणि नाल्यात पडून वाहून गेले. कल्याणच्या पत्री पुलाजवळ आज दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वानाच मोठा धक्का बसला. (Heartbreaking: A 4-month-old baby slips into a drain while walking on railway tracks)
आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे अंबरनाथ लोकलमधील काही प्रवासीही गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालू लागले. ज्यामध्ये चार महिन्यांचे छोटं बाळ घेऊन आजोबा आणि त्या बाळाची आईही होती.
त्यावेळी पत्री पुलाजवळ कल्याण दिशेकडील स्लो ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलच्या डाव्या बाजूने हे कुटुंब जात असताना ही दुर्घटना घडली. ही लोकल उभी असलेल्या ट्रॅकच्या खालून एक नाला वाहत होता आणि तो पार करण्यासाठी लोकलच्या डाव्या बाजूने अगदी अरुंद अशी जागा होती. त्या अरुंद जागेतून बाळाला घेऊन चालताना आईला काहीशी अडचण झाली. त्यामुळे त्याच्या आजोबांनी त्या बाळाला आपल्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आजोबांकडे हे बाळ देत असताना अचानक हातून बाळ निसटले आणि नाल्याच्या पाण्यात पडले आणि दोघांच्याही काळजात धस्स झाले. तिथे असणाऱ्या काही मुलांनी त्या नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काहीशी शोधाशोध केली. परंतू त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही.
आईचा आक्रोश पाहून पाणावले इतरांचेही डोळे…
आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती माय तर धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले.
दरम्यान प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिक कोळी बांधव, अग्निशमन दलाकडून बाळाचा कसून शोध घेतला जात आहे. तर काही तरी चमत्कार व्हावा आणि हे बाळ सुखरूप मिळावे अशी मनोमन प्रार्थनाही सर्वजण करीत आहेत.