राष्ट्रपती पदक विजेता शुभम वनमाळीसह मान्यवरांची उपस्थिती
कल्याण दि.२७ डिसेंबर :
कल्याणच्या कोचिंग क्लास क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या गुरुकुल सायन्स क्लासतर्फे आयोजित उमंग -२०२२ चा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झालेला पाहायला मिळाले. क्लासच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाने सादर केलेल्या धमाकेदार परफॉर्मन्सने सर्वांचीच मनं जिंकली. तर राष्ट्रपती पदक विजेता जलतरणपटू शुभम वनमाळी हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.
कोवीडच्या व्यत्ययामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर हा सोहळा होत असल्याने आयोजकांसह विद्यार्थ्यांमध्येही मोठी उत्सूकता होती. कल्याण पश्चिमेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात अतिशय देखण्या स्वरूपात हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती पदक विजेते जलतरणपटू शुभम वनमाळी, केडीएमसीचे सचिव संजय जाधव, बँकिंग तज्ञ सागर महाजन, शिक्षण अभ्यासक योगेश गंधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार न मानता त्यांना सामोरे जा यश तुमचेच असेल असे मत राष्ट्रपती पदक विजेत्या शुभम वनमाळी याने यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच इंग्लिश खाडीतील आपल्या पहिल्या आणि जलतरणाचा थरारक अनुभव त्याने यावेळी कथन केला. तर आपण आज कुठे आहोत यापेक्षा उद्या आपल्याला कुठे पोहचायचे आहे, याचे ध्येय आतापासूनच तुम्ही उराशी बाळगून काम करा असा मोलाचा सल्ला केडीएमसी सचिव संजय जाधव यांनी यावेळी दिला.
दरम्यान यावेळी गुरुकुल क्लासच्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत सुंदर असे नृत्य सादर करण्यात आले. तर क्लासच्या प्रमूख शिक्षकांसह इतर सहकाऱ्यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात मोठी दाद दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल सायन्स क्लासचे प्रमूख वैभव ठाकरे, संचालिका भाग्यश्री ठाकरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने मोठी मेहनत घेतली होती.