Home ठळक बातम्या गुढीपाडवा, शाळाप्रवेश वाढवा; केडीएमसी शाळांमध्ये एकाच दिवसात नविन प्रवेशाचा आकडा 400पार

गुढीपाडवा, शाळाप्रवेश वाढवा; केडीएमसी शाळांमध्ये एकाच दिवसात नविन प्रवेशाचा आकडा 400पार

महापालिकेच्या उपक्रमाला पालकांचा तुफान प्रतिसाद

कल्याण डोंबिवली दि.30 मार्च :
आपल्या नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीभिमुख प्रयत्नांमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण विभाग चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. त्यातच आजच्या गुढीपाडव्याचे औचित्य साधत शालेय विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी “गुढीपाडवा,शालेय प्रवेश वाढवा” या अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आणि त्याच्या पहिल्याच दिवसात थोडे थोडके नव्हे तर तब्बल 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी (403) प्रवेश घेत नवा इतिहास रचला. (Gudi Padwa, increase school enrollment; Number of new admissions in KDMC schools crosses 400 in a single day)

एकीकडे महापालिकेच्या शाळा, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा याबाबत काहीसे नकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ज्याचा दरवर्षी शाळेच्या घसरणाऱ्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होताना दिसतोय. मात्र हे चित्र बदलण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसांपासून कायापालट अभियानाद्वारे सुरू केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. केडीएमसी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ महापालिका शाळांचा चेहरा मोहराच नाही तर इथला शिक्षणाचा दर्जाही सुधारण्यावर शिक्षण विभागाकडून विशेष भर दिला जात आहे. त्यासोबतच आता महापालिका शाळांमधील पटसंख्या म्हणजेच शालेय प्रवेश वाढवण्यासाठीही शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. ज्याला पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश मिळाल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्वप्रथम आपल्या कार्यकाळात ही शाळा प्रवेशाच्या संकल्पनेची पायाभरणी झाली होती. त्याचीच री विद्यमान आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड या पुढे ओढताना दिसताहेत.

या कायापालट अभियानाचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश उपक्रम राबवण्यात आला. त्यापैकी उंबर्डे आणि पाथर्ली येथील शाळेमध्ये आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांच्या उपस्थितीत ही प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. या उपक्रमाद्वारे अधिकाधिक नव्या प्रवेशासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगत 500 नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे उद्दिष्ट ठेवले होते अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी दिली. प्रवेश घटती पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून त्याला पालकांनी मुलांचा चांगला प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांनी स्वतः काही विद्यार्थ्यांचे अर्जही भरून घेतले.

तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी असे कायापालट अभियान राबवत आहोत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात असून येत्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील. आज एकाच दिवसांत झालेले पहिलीचे हे 403 प्रवेश हे त्याचेच द्योतक असल्याचा विश्वास शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, तात्या माने, निलेश म्हात्रे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्यासह उंबर्डे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा