निळजे गावातील जेष्ठ ग्रामस्थांची आमदार राजू पाटील यांच्यासमोर स्पष्टोक्ती
कल्याण ग्रामीण दि.२ नोव्हेंबर :
कल्याण विधानसभा मतदार संघामध्ये राज्य शासनाचा महत्वाकांक्षी ग्रोथ सेंटर प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी एमएमआरडीएने आराखडाही तयार केला आहे. ग्रामीण भागाच्या योग्य नियोजनासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा कल्याण ग्रामीण मतदारसंघात हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याची स्पष्टोक्ती निळजे गावातील जेष्ठ ग्रामस्थांनी आमदार राजू पाटील यांच्यासमोर केली आहे. सर्वपक्षीय समितीचा विरोध असल्याने ग्रोथ सेंटर हे रखडले होते. मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीमधून निळजे गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी इथल्या माजी सरपंच आणि जेष्ठ नागरिकांनी ग्रोथ सेंटरबाबत स्पष्ट भूमिका मांडत तो होण्याची गरज व्यक्त केली.
२०१५ साली राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली होती. इथल्या १० गावातील १ हजार ८९ हेक्टर जागेवर हे कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र अद्याप ग्रोथ सेंटरची एक वीटही रचली गेलेली नाही. त्यातच २७ गाव सर्वपक्षीय विकास समितीकडून या ग्रोथ सेंटरला सतत विरोध असल्याने हा प्रकल्प सध्या रखडला आहे. परंतु या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह स्थानिकांच्या जमिनीचे योग्य नियोजन करून वाढीव एफएसआय मिळणार आहे. ग्रोथ सेंटरची निर्मिती झाल्यास गावांचे योग्य नियोजन होऊन नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर त्याचा आराखडा बनवला जाणार असल्याची बाब आता स्थानिक नागरीकांच्या लक्षात आल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ग्रोथ सेंटरला सुरुवातीपासून पाठिंबा…
तसेच ग्रोथ सेंटरच्या पहिल्या बैठकीला आपण उपस्थित होतो, त्यावेळी सर्वानी या ग्रोथ सेंटरला विरोध केला होता. मात्र ग्रोथ सेंटरच्या मुळ संकल्पनेत बदल करून काही सुधारणांसह त्याला मान्यता देण्याची भूमिका आपण मांडली होती अशी आठवणही आमदार पाटील यांनी यावेळी करून दिली. तसेच आपण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासून ग्रोथ सेंटरला पाठिंबा दर्शवला होता. मनसे हा एकमेव पक्ष आहे जो ग्रोथ सेंटरच्या बाजूने उभा होता. मात्र आता आता ग्रोथ सेंटरचा वस्तुस्थिती दर्शक अभ्यास करणारी जनता त्याचे समर्थन करत असून बहुतांशी युवकही त्याला पाठिंबा देताना दिसून येत असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.