
कल्याण पूर्व दि.15 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्याच अनुषंगाने आज कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनीही आपल्या प्रचाराचा वेग वाढवल्याचे दिसत आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात काल काढण्यात आलेल्या त्यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथून माता रमाबाई आंबेडकर चौक, उतेकर सदन, बौद्ध विहार, आनंदवाडी, पुना लिंक रोड, शिवाजी कॉलनी या मार्गावार ही प्रचार फेरी काढण्यात आली. १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांना सर्वसामान्य नागरिक आणि मुख्यता महिला वर्गाकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या प्रचारफेरीला भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना विधानसभा संघटक रमाकांत देवळेकर, कल्याण पूर्व शहरप्रमुख निलेश शिंदे, उपसंघटक राधिका गुप्ते, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा सविता देशमुख, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, इंदिरा तरे यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.