![Grand Inauguration of Super League Inter-School Football Tournament organized for the first time in Kalyan; Concept of MLA Vishwanath Bhoir](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241008-WA0013-640x360.jpg)
30 हून अधिक शाळांचे फुटबाल संघ झाले सहभागी
कल्याण दि.8 ऑक्टोबर :
कल्याणमध्ये पहिल्यादांच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आज दिमाखदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लालचौकीजवळील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभूनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार 8 आणि बुधवार 9 ऑक्टोबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील 30 हून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच 15 वर्षे आणि 17 वर्षांखालील खेळाडू असे या स्पर्धेसाठी दोन गट पाडण्यात आले आहेत. सेंट लॉरेन्स आणि आचिव्हर्स या दोन शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला.
सगळीकडेच आपल्याला क्रिकेटचे सामने आयोजीत केलेले पाहतो. ते पाहता आपल्या परिसरातील अनेक उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील फुटबॉल खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तसेच क्रिकेट स्पर्धेप्रमाणे अशा प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यासाठी शिवसेनेकडून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाहीही आमदार भोईर यांनी यावेळी दिली.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील यांच्यासह विभागप्रमुख राम तरे, अंकुश केणे, युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी, शाखाप्रमुख रोशन चौधरी, दिनेश शिंदे, तुकाराम टेमघरे, सतीश भोसले, रजनी भोईर, सुरेखा दिघे, भारत भोईर, भरत भोईर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.