Home कोरोना गुड न्यूज ; कल्याण डोंबिवलीतील ‘त्या’ ओमीक्रॉन पेशंटला मिळाला डिस्चार्ज ; कोवीड...

गुड न्यूज ; कल्याण डोंबिवलीतील ‘त्या’ ओमीक्रॉन पेशंटला मिळाला डिस्चार्ज ; कोवीड रिपोर्ट आले निगेटिव्ह

 

कल्याण – डोंबिवली दि.8 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशासाठी एक अत्यंत दिलासादायक घटना कल्याण डोंबिवलीत घडली आहे. नवा कोवीड व्हेरीयंटओमीक्रॉनचा पहिला रुग्ण असणाऱ्या डोंबिवलीतील त्या व्यक्तीला डिस्चार्ज आज देण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आज त्या रुग्णाचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशीच डिस्चार्ज मिळाल्याने अनोखा दुग्धशर्करा योग जुळून आला. ( maharahstras First patient of omicron gets discharge)

गेल्या महिन्यात 24 तारखेला हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबई मग दिल्लीमार्गे आणि दिल्लीतून मुंबई असा प्रवास करत ओलाद्वारे डोंबिवलीत आला होता. या दरम्यान दिल्ली विमानतळावर करण्यात आलेल्या कोवीड चाचणीचा अहवाल मुंबईत पोहचल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे त्याला समजले. आणि मग त्याने आपल्या घरच्यांना माहिती देत त्यांना आपल्या नातेवाईकांकडे राहायला पाठवले. आपल्याच घरी होम कॉरंटाईन असताना ताप आल्याने एका खासगी लॅबकडून त्याने पुन्हा आपली कोवीड चाचणी केली. त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि लॅबमार्फत ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून परतल्याची माहिती केडीएमसी समजल्यावर शासनाची सूत्रे हालली. या व्यक्तीला तातडीने केडीएमसीच्या विलगीकरण केंद्रात दाखल करत त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईत पाठवण्यात आले. त्याच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आणि जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्याला ओमीक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यातील ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आल्याने केडीएमसी आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली.

मात्र कोवीड रिपोर्ट आणि ओमीक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही सुदैवाची बाब म्हणजे या रुग्णामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती की त्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची करण्यात आलेली कोवीड चाचणी निगेटिव्ह आली.

त्याचबरोबर 27 नोव्हेंबरपासून केडीएमसीच्या विलगीकरणात असताना या रुग्णाची दोन वेळा कोवीड चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्यांमध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अखेर आज संध्याकाळी 6 वाजता त्याला डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच आज त्या व्यक्तीचा वाढदिवस असून त्याच दिवशी डिस्चार्ज मिळाल्याने अनोखा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
तर आज या रुग्णाला मिळालेला डिस्चार्ज हा ओमीक्रॉन, ओमीक्रॉनच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून आदळआपट करणाऱ्यांसाठी नक्कीच सणसणीत चपराक आहे. आणि लॉकडाऊनच्या धक्क्यातून आताशी कुठे सावरत असणाऱ्या सामान्य नागरिक, व्यापारी वर्गासाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा