(प्रातिनिधिक छायाचित्र)
कल्याण – डोंबिवली दि.17 मार्च :
शासनाच्या निर्देशानुसार केडीएमसी क्षेत्रातही 12 ते 14 वयोगटातील मुला – मुलींच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना Corbevax या लसीची पहिली मात्रा आता देण्यात येणार असून 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, साथरोग नियंत्रण विभागाच्या डॉ. प्रतिभा पानपाटील, रुख्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके आदींच्या उपस्थितीत या लसीकरणाला प्रारंभ झाला.
लस घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक..
या लसीकरणाकरीता मुला-मुलींचे वय 12 वर्ष पुर्ण असणे आणि 14 वर्षापर्यंतच असणे आवश्यक आहे. म्हणजेच दिनांक 16 मार्च 2008 ते 16 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेल्या मुलां- मुलींनाच लस घेता येणार आहे. ही लस घेण्याकरीता मुलांची जन्मतारीख असलेला कोणताही 1 पुरावा ( आधार कार्ड, जन्म दाखला, शाळेचे ओळखपत्र इ. ) येतांना सोबत आणणे आवश्यक आहे.
12 ते 14 वयोगटाचे याठिकाणी होणार लसीकरण…
महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (पश्चिम ) आणि शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली( पश्चिम) येथे 17 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते सायं. 5 यावेळेत ही लस दिली जाईल. तर 18 मार्च 2022 रोजी धुलीवंदन असल्यामुळे यादिवशी लसीकरण बंद राहणार असून 19 मार्च 2022 पासुन नियमितपणे लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.