गणेशोत्सवासाठी नियमावलीही जाहीर
कल्याण – डोंबिवली दि.2 सप्टेंबर :
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी प्रशासनाने यंदाही मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरण्याचा महत्वाचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत ऑनलाईन झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. त्याचसोबत केडीएमसी क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदापासून फायर एनओसी बंधनकारक करण्यासह विविध नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून आर्थिक अडचणीत आलेल्या गणेशोत्सव मंडळांना शुल्कमाफ करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून केली जात होती. शिवसेना नेते रवी पाटील यांनीही गेल्या आठवड्यात केडीएमसी प्रशासनाकडे शुल्कमाफीची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत ऑनलाईन बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच कोवीडबाबत शासनाकडून जारी करण्यात आलेले नियम पाळून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत शुल्कमाफीचा निर्णय जाहीर केला.
कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनीही फायर एनओसी घेणे बंधनकारक असल्याची माहिती आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
शासकीय परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’…
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाहतूक पोलिस अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, महावितरणकडील तात्पुरती वीज मीटरची परवानगी आणि स्थानिक पोलिस स्टेशनचा ना-हरकत दाखला आदी परवानग्या देण्यासाठी संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत स्थानिक पोलिस स्टेशननिहाय कर्मचा-याची नियुक्ती केली जाणार आहे. त्याअंतर्गत “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येणार असून मंडळांनी परवानगीसाठी 5 सप्टेंबर, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
68 विसर्जन स्थळी आणि विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांचा वॉच
महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी आणि विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांचा वॉच असणार आहे. तसेच या सर्व ठिकाणी 2 हजार 447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली असून प्रकाश व्यवस्थेसाठी एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहेत.
यंदाही ‘विसर्जन आपल्या दारी उपक्रम’
कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील *”विसर्जन आपल्या दारी”* हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सुचना अधिका-यांना देण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
गणेशोत्सव मंडळाच्या *मंडपाची साईज 6×8 इतकीच…
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी. गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने आणि विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करण्याचे आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. या ऑनलाईन बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता.