गेल्याच रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते भूमीपूजन
डोंबिवली दि.9 मार्च :
कल्याण डोंबिवलीकरांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. कल्याण तळोजा 12 (kalyan taloja metro 12) या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी या मेट्रो प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा गेमचेंजर कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असून या प्रकल्पासाठी तब्बल 5 हजार 865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील लाखो लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासोबतच लोकांच्या वेळेची आणि इंधनाचीही मोठी बचत होण्यास मदत होईल.
याठिकाणी मेट्रोचे पहिले पाईल ड्रील…
कल्याण तळोजा या मेट्रो 12 साठी कल्याण शीळ मार्गावरील नवीन पलावा शेजारी असलेल्या भागात या प्रकल्पाचे पहिले पाईल ड्रील करण्यात आले. या पाईल ड्रीलमधील माती परीक्षण अहवाल आल्यानंतर पुढील कामाला आणखी वेग येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मेट्रो 12 मध्ये असणार १९ उन्नत स्थानके…
या 12 मेट्रो प्रकल्पामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान १९ उन्नत स्थानके असणार असून या स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदाही जाहीर करण्यात आली आहे. त्यात आज या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाल्यानंतर त्याच्या कामाला आणखीनच गती प्राप्त होणार आहे. आगामी ३० महिन्यात हे मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर ही मेट्रो लाखो लोकांच्या सेवेत दाखल होईल.
दरम्यान भूमीपुजनानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करण्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही आभार मानले आहेत.