कॅन्सरवरील उपचार माफक दरांमध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांसाठी फायदेशीर
कल्याण दि.16 जुलै :
कल्याणातील सुप्रसिद्ध आयुष ॲनेक्स हॉस्पिटलमध्ये नामांकित ऑन्कोथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी कॅन्सरवरील उपचार माफक दरांमध्ये उपलब्ध झाल्याने कॅन्सर रुग्णांसाठी हे सेंटर मोठे फायदेशीर ठरणार आहे. पद्मभूषण – पद्मश्री पुरस्कारप्राप्त कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी आणि आयुष ॲनेक्स हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हे “डे केअर एंजलस् ऑन्कोथेरपी सेंटर” सुरू करण्यात आले आहे. (Good News : Inauguration of renowned Oncotherapy Center at Ayush Annex Hospital, Kalyan)
माफक दरांमध्ये कॅन्सरवरील उपचार …
पद्मभूषण – पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी हे कॅन्सर क्षेत्रात केवळ भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर नावाजलेले असे व्यक्तीमत्व. तर गेल्या दिड दशकांपासून कल्याणकरांना अत्युच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे नाव म्हणजे आयुष हॉस्पिटल. या हॉस्पिटलची विस्तारित शाखा असलेल्या वायले नगर येथील आयुष ॲनेक्स हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरेश अडवाणी यांच्या सहकार्याने हे एंजलस् डे केअर सेंटर सुरू झाले आहे. याठिकाणी माफक दरांमध्ये कॅन्सरवरील उपचार उपलब्ध असल्याने कल्याणसह उल्हासनगर , अंबरनाथ, बदलापूर आदी आसपासच्या परिसरातील कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मॅमोग्राफी टेस्ट केवळ 500 रुपयांमध्ये…
या सेंटरमध्ये कॅन्सरवरील प्रगत असे किमो थेरपी , टार्गेटेड थेरपी, इम्युनो थेरपी उपलब्ध आहेत. सामाजिक भान बाळगून आयुष ॲनेक्स हॉस्पिटलकडून यासाठी लागणारी औषधे 20 ते 30 टक्के कमी किमतीमध्ये दिली जाणार आहेत. तर महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी मॅमोग्राफी टेस्ट हेल्पींग हॅण्ड सामाजिक संस्थेच्या सहाय्याने केवळ 500 रुपयांमध्ये याठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती आयुष हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश राजू यांनी दिली. त्यामुळे कल्याणसह आसपासच्या परिसरातील कॅन्सर रुग्णांसाठी हे सेंटर नक्कीच मोठे वरदान ठरेल अशी आशा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाश्च्यात्य जीवनशैली ही देखील वाढत्या कॅन्सरला कारणीभूत – डॉ. अडवाणी
सध्या कॅन्सर आजारावर पूर्वीपेक्षा अधिक परिणामकारक आणि चांगली उपचार पद्धती तसेच औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होणे हा डॉक्टर आणि रुग्ण या दोघांसाठी महत्त्वाचा घटक असल्याची प्रतिक्रिया कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी यावेळी दिली. आपल्याकडे अंगिकारली गेलेली पाश्च्यात्य जीवनशैली ही देखील वाढत्या कॅन्सरला कारणीभूत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, हेल्पिंग हॅण्ड संस्थेच्या गीता अडवाणी, माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयुष हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश राजू, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. शशांक पाटील, डॉ. हिमांशू ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.